

जळगाव : भारत-पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून, देशभरात काही महत्त्वाच्या ठिकाणी नागरी संरक्षण दलाकडून मॉक ड्रिल घेतले जाणार आहेत. युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना सजग करण्यासाठी आणि आवश्यक ती तयारी ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून हे आदेश दिले आहेत. मात्र, जळगाव जिल्ह्यात नागरी संरक्षण दल अस्तित्वातच नसल्याने येथील सगळी जबाबदारी पोलिस प्रशासनावरच येणार आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. देशातील काही संवेदनशील ठिकाणी मॉक ड्रिलचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार, भुसावळ तिसऱ्या क्रमांकाच्या संवेदनशील शहरांमध्ये समाविष्ट असूनही येथे नागरी संरक्षण दल कार्यरत नाही.
नागरी संरक्षण दलाच्या नियमांनुसार देशातील शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या श्रेणीत मुंबई, उरण, आणि तारापूर येतात. दुसऱ्या श्रेणीत ठाणे, पुणे, नाशिक, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड यांचा समावेश आहे. तर तिसऱ्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही शहरे येतात.
भुसावळ तालुका हा जळगाव जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा तालुका मानला जातो. येथे रेल्वे विभाग आहे, ज्याच्या माध्यमातून भारतातील कोणत्याही कोपऱ्यात सहज जाता येते. तसेच वरणगाव आणि भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरी, दिपनगरचे विद्युत केंद्र, हतनूर धरण, आरपीडी डेपो, वाघूर धरण यांसारखी महत्त्वाची ठिकाणे येथे आहेत.
या पार्श्वभूमीवर, मॉक ड्रिल वा युद्धजन्य तयारीसाठी पोलिस प्रशासनालाच सर्व हालचाली कराव्या लागणार आहेत. रेल्वे विभागात नागरी संरक्षण दल कार्यरत आहे, मात्र त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, "यासंदर्भात मला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी उद्या मुंबईला असून तिथे यंत्रणांशी याबाबत चर्चा करणार आहे." दरम्यान, जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख नरवर सिंग रावळ यांनी स्पष्ट केले की, हे सर्व आदेश नागरी संरक्षण दलासाठी आहेत, आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी नाहीत.