

जळगाव : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच, काम करणाऱ्या ठेकेदाराकडून सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसत आहे. कार्यालय परिसरात दररोज हजारो नागरिक ये- जा करत असताना, मात्र, ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेलाच विना- क्रमांकाचे पाण्याचे टँकर उभे करणे, बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकणे आणि कामात अनेक त्रुटी ठेवल्या जात असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्यावर अडथळा
सामान्य प्रशासन कार्यालयाच्या अगदी समोर आणि रस्त्याच्या वळणावर बांधकाम साहित्य (कच) आणि पाण्याचे टँकर लावून ठेवले जात आहेत. यामुळे कार्यालयात ये- जा करणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. बांधकामस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही सूचना फलक लावलेला नाही. रस्त्यावर अडचणी निर्माण होतील असे काम सुरू आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे.