Jalgaon News : रावेरात सत्तेसाठी ‘कपडेफाड’ राडा; भाजपला दे धक्का, अजित पवार गटाचा 'करिश्मा'

रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी सत्तेसाठी अक्षरशः 'महाभारत' घडले.
Jalgaon News Raver political clash
Published on
Updated on

जळगाव : रावेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी सत्तेसाठी अक्षरशः 'महाभारत' घडले. सभागृहात लोकशाहीचा उत्सव साजरा होण्याआधीच बाहेर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या ओढताणीत चक्क एका नगरसेवकाचे कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या अभूतपूर्व गदारोळानंतर झालेल्या मतदानात राजकीय गणिते पूर्णपणे उलटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आसिफ मोहम्मद यांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारत उपनगराध्यक्षपदावर कब्जा मिळवला.

सोमवारी (दि. १२) उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेपूर्वीच पालिका परिसर रणांगण बनला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप-अजित पवार गट यांच्या समर्थकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मतदानासाठी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी झालेली ओढताण इतकी विकोपाला गेली की, शरद पवार गटाचे नगरसेवक गणेश सोपान पाटील यांच्या अंगावरील कपडे फाडण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव निवळला, पण या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली.

असा पलटला डाव

गोंधळ शमल्यानंतर नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. भाजपकडून राजेंद्र चौधरी तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) आसिफ मोहम्मद रिंगणात होते. भाजप विजयासाठी आश्वासक असतानाच, काँग्रेसचे दोन आणि शरद पवार गटाच्या एका नगरसेवकाने 'पलटी' मारत आसिफ मोहम्मद यांच्या पारड्यात वजन टाकले. या 'बंडखोरी'मुळे भाजपच्या हातून सत्ता निसटली आणि आसिफ मोहम्मद विजयी झाले.

मतदानाची आकडेवारी

आसिफ मोहम्मद यांना राष्ट्रवादीचे दारा मोहम्मद, सानिया साउथ, मोहम्मद समी, रुबीना बी. शेख, शेख सादिक, गोपाळ बिरपन, सालेहा कौसर, नरेंद्र उर्फ पिंटू वाघ यांच्यासह काँग्रेसच्या शाहीन खान, अनिता तायडे आणि शरद पवार गटाचे गणेश पाटील यांचे मतदान मिळाले.

दुसरीकडे, भाजपच्या गोटात नगराध्यक्षा संगीता महाजन, राजेंद्र चौधरी, अरुण अस्वार, राजेश शिंदे, योगिता महाजन, सपना महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार, अपक्ष नितीन महाजन व प्रमिला पाटील यांची मते पडली, जी विजयासाठी अपुरी ठरली.

तिघे झाले स्वीकृत नगरसेवक

उपनगराध्यक्ष निवडीच्या धामधुमीत स्वीकृत नगरसेवकांची निवडही पार पडली. यात पद्माकर महाजन, दिलीप हिरामण पाटील आणि राष्ट्रवादीकडून विनीत सूर्यकांत अग्रवाल यांची वर्णी लागली. मात्र, निवडणुकीपेक्षा पालिकेबाहेर झालेला 'कपडेफाड' राडाच दिवसभर चर्चेचा विषय ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news