

जळगाव : पुणे आणि मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त मोहिम राबवून मध्य प्रदेशातील उमर्टी गावातील उमर्टी शिकलगार आर्म्स येथे तयार होणाऱ्या अवैध शस्त्रांचे जाळे उद्ध्वस्त केले. शनिवारी (दि.22) रोजी झालेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, साहित्य आणि आरोपी ताब्यात घेण्यात आले. जळगाव पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांचाही या मोहिमेत सहभाग होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत पुण्यात गुन्हेगारांकडून वापरल्या गेलेल्या अनेक शस्त्रांचा माग उमर्टी गावापर्यंत पोहोचला होता. जप्त झालेल्या काही शस्त्रांवर यूएसए असा शिक्का आढळल्यानंतर तपास अधिक गतीमान झाला. त्यातून उमर्टी शिकलगार आर्म्सचे अवैध शस्त्र उत्पादन स्पष्ट झाल्याने ऑपरेशन उमर्टी हाती घेण्यात आले.
या मोहिमेसाठी उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकासोबत मोबाईल सर्व्हिलन्स वाहनं, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेटप्रूफ जॅकेट, बॉडीवॉर्न कॅमेरे, ड्रोन, बीडीडीएस टीम आणि श्वानपथक अशी साधनं वापरण्यात आली होती.
उमर्टी गाव महाराष्ट्र सीमेवर असले तरी ते मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात येते. उमर्टी गाव दुर्गम भागात असल्याने पोलिसांनी कारवाईच्या तीन दिवस आधी ड्रोनच्या मदतीने रस्ते आणि परिसराची माहिती गोळा केली.
या संयुक्त मोहिमेत खरगोन आणि बिडिया पोलिस ठाण्यांचे प्रभारी दीपक यादव आणि धर्मेंद्र यादव यांनी पाहणीचे काम पाहिले. निमाड रेंजचे डीआयजी यांच्या मार्गदर्शनाखाली चार वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली. पुणे पोलिसांचे डीसीपी सोमय मुंडे, खंडवा आणि खरगोन जिल्ह्यांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बिट्टू सहगल, बडवाणी जिल्हा अधीक्षक जगदीश डावर, एसडीपीओ अजय वाघमारे आणि वारला पोलिस ठाण्याचे प्रभारी नारायण रावल यांच्या नेतृत्वात जवळपास 200 अधिकारी व कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले.
तपासात विविध ठिकाणी छापे टाकून सात जणांना अटक करण्यात आली. वारला पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत एक देशी पिस्तूल आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त केले. जप्त मालाची किंमत अंदाजे 25 हजार रुपये आहे. अटक झालेल्यांमध्ये सत्वन सिंग, अवतार सिंग आणि नूरबीन सिंग अशी नावे असून त्यांच्याकडून लोखंडी पाईप, धारदार हत्यारे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी स्वतंत्रपणे सात जणांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. आरोपींमध्ये राजपाल सिंग, नानक सिंग, गुरुचरण सिंग, आवसिंग, बच्चन सिंग, जशवीर सिंग, प्रवीण सिंग आणि आलोक सिंग यांचा समावेश आहे. एकूण 30 ते 40 आरोपींना विविध पथकांनी अटक केल्याची माहिती आहे.