

जळगाव : नशिराबाद येथे सोमवार (दि. २२) रात्री कौटुंबिक वादातून एका विवाहितेने सहा वर्षांच्या मुलीसह धावत्या रेल्वेखाली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनीषा चंद्रकांत कावळे (२८) आणि मुलगी गौरी चंद्रकांत कावळे (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा नंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली असून, मायलेकीने टोकाचं पाऊल उचलण्या मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मनीषा कावळे पती चंद्रकांत आणि दोन मुलींंसह भवानीनगर येथे राहत होत्या. चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत काम करतात. सोमवारी (दि. २२) दुपारी मनीषा कावळे या रेशनचे धान्य आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून लहान मुलगी गौरीसह घराबाहेर पडल्या. मात्र, त्या परतल्या नाहीत. रात्री भादली रेल्वे पुलाजवळ महिला आणि लहान मुलगी रेल्वेखाली आल्याची माहिती मिळाल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.
या घटनेमुळे कावळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हा जीवनयात्रा संपविण्या मागील कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, पुढील तपास नशिराबाद पोलिस करत आहेत.