मदतीचा हात की वासनेचा विळखा? 'लाडकी बहीण' योजनेच्या नावाखाली विनयभंग

Jalgaon Molestation Case | E-Kyc करून देण्याच्या बहाण्याने मैत्रीला काळिमा; नराधमाकडून शरीरसुखाची मागणी
Molestation Case
Molestation CasePudhari
Published on
Updated on

जळगाव : सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करत असताना, दुसरीकडे याच योजनेच्या नावाखाली महिलांची अडवणूक करून त्यांच्या असहायतेचा फायदा घेणारे नराधम समाजात वावरत आहेत. जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात अशाच एका नराधमाने 'लाडकी बहीण' योजनेचे 'केवायसी' करून देण्याच्या बहाण्याने एका विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ३५) या आपल्या पती आणि मुलांसह गेंदालाल मिल परिसरात राहतात. त्यांचे पती गोलाणी मार्केटमध्ये काम करतात. संशयित आरोपी गोकुळ चव्हाण हा पीडित पतीचा मित्र असल्याने त्याचे घरात येणे-जाणे होते. फिर्यादी महिलेला 'लाडकी बहीण' योजनेचे नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे मिळाले नसल्याने त्यांना अर्जाचे 'केवायसी' करायचे होते. पतीचा मित्र असल्याने त्यांनी गोकुळवर विश्वास टाकला, पण याच विश्वासाला त्याने तडा दिला.

२५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला घरात एकटी असताना गोकुळ चव्हाण कागदपत्रे घेण्यासाठी तेथे आला. त्याने महिलेला "मी तुमचे काम करून देतो, पण तुम्हाला एक विषय बोलायचा आहे" असे सांगून चक्क शरीरसुखाची मागणी केली. या प्रकाराने हादरलेल्या महिलेने त्याला जाब विचारला असता, "मी तुमची परीक्षा घेत होतो" असे सांगून तो पळून गेला.

संतापजनक बाब म्हणजे, गोकुळ चव्हाणची मजल एवढ्यावरच थांबली नाही. त्याने फेब्रुवारी महिन्यात समोरच्या गल्लीतील एका विधवा महिलेलाही 'विधवा पेन्शन' सुरू करून देण्याच्या नावाखाली प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. म्हणजे सरकारी योजनांचे आमिष दाखवून महिलांची शिकार करणे हाच या नराधमाचा धंदा असल्याचे दिसून येत आहे.

पतीने समज दिल्यानंतरही मार्च महिन्यापासून आरोपी गोकुळ हा महिलेचा पाठलाग करत होता. महिलेच्या किचनसमोर उभे राहून अश्लील नजरेने पाहणे, घरासमोर येऊन थांबणे अशा हरकती तो सातत्याने करत होता. अखेर ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पुन्हा त्याने घरासमोर येऊन महिलेला त्रास दिल्याने, पीडितेने धीर एकवटून पतीसह पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गोकुळ चव्हाण विरुद्ध विनयभंग आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news