Jalgaon News : किनगावमध्ये पथसंचलनावरून तणाव: आंदोलकांकडून दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठीमार, प्रचारकासह पोलीस जखमी

जमावाला पांगवून संचलन पूर्ण, संशयित पोलिसांच्या ताब्यात
Jalgaon News
Published on: 
Updated on: 

जळगाव : यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) नियोजित विजयादशमी पथसंचलनावरून रविवारी (दि. २५) सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. संचलनाच्या मार्गाला विरोध करत रस्त्यावर बसलेल्या आंदोलकांपैकी काहींनी अचानक दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. या दगडफेकीत संघाचे जिल्हा प्रचारक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तीन तास समजावण्याचा प्रयत्न

किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते. संचलनाचा मार्ग नायगाव मुख्य रस्त्यावरून निश्चित होता आणि पोलिसांनी या मार्गाला रीतसर परवानगीही दिली होती. मात्र, सकाळी काही नागरिकांनी या मार्गावर आक्षेप घेत रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्यासह दंगा नियंत्रण पथक आणि मोठा फौजफाटा तातडीने किनगावात दाखल झाला. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

दगडफेक आणि पोलिसांची कारवाई

चर्चेनंतरही परिस्थिती निवळत नसल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. या घटनेत संघाचे जिल्हा प्रचारक आणि कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी जखमी झाले. अचानक उद्भवलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बळाचा वापर करत जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणून ठरलेल्या मार्गावरून पथसंचलन पूर्ण केले.

कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई: पोलीस अधीक्षक

घटनेनंतर गावात शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, "पथसंचलनाला विरोध करत काही नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिला होता. त्यांना तीन तास शांततेने समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांनी सहकार्य केले नाही. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सौम्य बळाचा वापर करून संचलन शांततेत पूर्ण करण्यात आले. दगडफेक करणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news