

जळगाव : बुऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-७५३बी) चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फैजपूर (ता. यावल) येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या सहभागी होत समस्यांवर चर्चा केली.
या महामार्गाचा तळोदा जंक्शनपासून सुरू होणारा तळोदा–शिरपूर–चोपडा–यावल–फैजपूर–सावदा–रावेर असा एकूण २४० किमीचा पट्टा आहे. हा महामार्ग मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत जात असून चौपदरीकरणासाठी जमीन संपादन प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, भूसंपादन प्रक्रियेमुळे अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातील राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार अमोल हरिभाऊ जावळे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे (NHAI) अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.