

जळगाव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आयोजित इस्रो (ISRO) शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या सहलीत आदिवासी आश्रम शाळेतील 18 विद्यार्थी व 6 शिक्षकांनी अहमदाबाद येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरला भेट दिली.
अंतराळ संशोधनाची आधुनिक तंत्रज्ञानातील माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. तसेच सायन्स सिटीमधील एक्वेरियम, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागांचा अभ्यास करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन शैक्षणिक सहलीमध्ये समजून घेतला.
या सहलीसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमातून निधी मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री रक्षा खडसे, गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी रेल्वे व विमान अशा विविध प्रकारच्या प्रवासाचा अनुभव घेतला. अंतराळ संशोधनाच्या प्रत्यक्ष अनुभवानं त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, अनेकांनी भविष्यात वैज्ञानिक होण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षकांनीही अशा सहलींमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा व ज्ञान वाढते, असे मत व्यक्त केले. या सहलीचे यशस्वी आयोजन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी पवनकुमार पाटील, आर. एम. लावणे, संदीप पाटील, एल. एम. पाटील, एम. आर. सुलताणे, व्हि. डी. गायकवाड, एम. डी. पाईकराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.