

Jalgaon News
जळगाव: मैत्रीचा बहाणा करून अल्पवयीन मुलीचे गुपचूप फोटो काढायचा आणि त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा, असा नराधमपणा एका तरुणाने केल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे.
पीडितेचे लग्न जमल्यानंतर या नराधमाने चक्क इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडून आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले, ज्यामुळे पीडितेचे लग्न मोडले आहे. याप्रकरणी नराधम रवींद्र राठोडविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसांत पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र ओंकार राठोड (रा. गोरखपूर तांडा) याने सुमारे दोन वर्षांपूर्वी पीडित मुलीचे काही फोटो काढले होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात चैत्र महिन्यातील पाटणादेवी यात्रेच्यावेळी त्याने या फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. "मी सांगतो तसे कर, नाहीतर तुझे फोटो व्हायरल करेन आणि तुझे लग्न कोणाशीही होऊ देणार नाही," अशी धमकी त्याने दिली होती.
दिवाळी सण संपल्यानंतर साधारण १५ दिवसांनी रात्री ८ वाजेच्या सुमारास रवींद्रने पीडितेवर दबाव आणला. गोरखपूर तांडा येथील शाळेच्या मागील परिसरात असलेल्या पडिक शेतात त्याने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची भीती त्याने घातल्यामुळे पीडिता गप्प राहिली.
काही दिवसांपूर्वी पीडितेचे लग्न जमल्याची माहिती आरोपी रवींद्रला मिळाली. यामुळे त्याने पुन्हा आपला सैतानी चेहरा समोर आणला. "तू भेटायला आली नाहीस तर तुझे लग्न मोडून टाकीन," अशी धमकी देऊन त्याने तिला एका घरात बोलावले आणि पुन्हा अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने इन्स्टाग्रामवर एक बनावट अकाऊंट तयार केले आणि त्यावर पीडितेचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले. यामुळे पीडितेची मोठी बदनामी होऊन तिचे ठरलेले लग्न मोडले आहे.
मुलीच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र राठोडविरुद्ध बीएनएस ६४(२)(फ), ६४(२)(म), ३५१(१), ३५६(१) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ या प्रकरणाचा कसून तपास करत असून, अद्याप आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.