

जळगाव : निवृत्तीनगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ८८ हजार २७० रुपयांचे सोन्या–चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि.20 ) रात्री जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
जितेंद्र जिजाबराव पाटील (वय ३६, रा. निवृत्तीनगर) हे व्यापारी रविवार (दि.16) च्या दुपारी तसेच बुधवार (दि.19) रोजी दुपारी घराबाहेर होते. या दरम्यान चोरट्यांनी संधी साधत बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्या चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन पळ काढला.
घरी परतल्यानंतर जितेंद्र जिजाबराव पाटील यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरुवार (दि.20) रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस उपनिरीक्षक उल्हास चहाटे पुढील तपास करत आहेत.