

जळगाव : पंजाब संघाने आपल्या उत्तम खेळीच्या जोरावर कर्नाटक संघावर २-० ने मात करत सलग दुसऱ्यांदा १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात काटेकोर लढत दिली. मात्र दुसऱ्या सत्रात पंजाबने दोन अप्रतिम गोल करत सामना जिंकला.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विजयी व उपविजयी संघांना चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. “खेळ ही केवळ स्पर्धा नसून सांघिक भावना, समन्वय आणि खेळाडूवृत्ती यांचे दर्शन घडवते. प्रत्येकाने ही वृत्ती जोपासावी,” असे ते म्हणाले.
स्पर्धेत ९ राज्यांतील १४४ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत एकूण १९ सामने खेळले गेले, ज्यात ७० गोल झाले. अंतिम फेरीसाठी पंजाबने महाराष्ट्र तर कर्नाटकने बिहारचा पराभव केला .
बेस्ट गोलकिपर म्हणून फातेमा दलाल (महाराष्ट्र), सर्वोत्तम खेळाडू व सर्वाधिक गोल (१०) जोया हसन (पंजाब), बेस्ट डिफेन्समध्ये सोनिया अटवाल (पंजाब), उत्कृष्ट खेळाडू म्हणून अर्पिता तानिया (कर्नाटक) या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरणावेळी पंजाबी संघाने पारंपरिक नृत्य सादर केले.
कार्यक्रमास अर्णवकुमार शॉ (सीआयएससीई), सिद्धार्थ किर्लोस्कर, अशोक जैन, अतुल जैन, सौ. निशा जैन, देबासिस दास, ललिता सावंत, फारूख शेख, अरविंद देशपांडे, अब्दुल मोहसीन आदी उपस्थित होते.
अर्णव शॉ यांनी अनुभूती स्कूलच्या उत्तम आयोजनाचे कौतुक केले. निशा जैन यांनी पुढील स्पर्धांमध्ये क्रिकेट व तायक्वांदो स्पर्धांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले. पलक संघवी हिने सूत्रसंचालन केले तर प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले.