Jalgaon Politics : खडसेंनी बोदवडमधील गुन्ह्यावरून पोलिसांसह विरोधकांवर डागली तोफ, सूडबुद्धीने FIR फाडल्याचा नाथाभाऊंचा आरोप

Eknath Khadse
एकनाथ खडसेfile photo
Published on
Updated on

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी आपल्यावर बोदवड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याला 'राजकीय सूड' असल्याचे म्हटले आहे. "ज्या जमिनीचा व्यवहार २००२ मध्ये झाला, त्याबाबत २४ वर्षांनंतर गुन्हा दाखल होणे हा निव्वळ छळ आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, ज्या जमिनीला महसूल मंत्र्यांनी विधानमंडळात 'वर्ग-१' ची जमीन म्हटले, तिला 'महार वतन' दाखवून शासनाची दिशाभूल केल्याचा खळबळजनक दावाही खडसेंनी केला आहे.

नेमका मुद्दा काय?

बोदवड येथे दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, ही जमीन माझ्या मुलीने खरेदी केली असून ती पूर्णपणे 'वर्ग-१' ची आहे. सातबारा उताऱ्यावरही तशीच नोंद आहे. खरेदीच्या वेळी रेडी रेकनरप्रमाणे स्टॅम्प ड्युटी भरली असून जमीन मालकांना बाजारभावापेक्षा जास्त रक्कम दिली आहे. यात कोणताही गैरप्रकार किंवा ॲट्रॉसिटीचा गुन्हा घडलेला नाही. केवळ राजकीयदृष्ट्या त्रास देण्यासाठी पोलिसांनी हा 'बनावट' एफआयआर दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला.

'त्या' पुढाऱ्यांनी ब्लॅकमेलचा प्रयत्न केला!

या व्यवहाराचा साखर कारखान्याशी काहीही संबंध नाही, तिथे इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता पण तोही खाजगी व्यवहार होता, असे खडसे यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात काही संघटनांच्या पुढाऱ्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, मात्र "चुकीचे काही केले नसल्याने मी झुकलो नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले. आता या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आपण स्वतः 'खाजगी फिर्याद' दाखल करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

पोलिसांच्या 'दुटप्पी' भूमिकेवर प्रहार

खडसे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढले असून गंभार आरोप केले आहेत.

मुरूम चोरीकडे दुर्लक्ष : तासखेडा-सावदा परिसरात लाखो रुपयांचा मुरूम चोरीला गेला. महसूल आणि पाटबंधारे विभागाने पत्र देऊनही पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नाहीत.

२३ कोटींचे भंगार : मुक्ताईनगरमध्ये पाटबंधारे विभागाचे २३ कोटींचे भंगार चोरीला गेले, त्याचे पुरावे देऊनही पोलीस ढिम्म आहेत.

सोयीची कारवाई : "जिथे पोलिसांचे हित जोपासले जाते तिथे एफआयआर टाळला जातो, आणि जिथे सर्व काही कायदेशीर आहे तिथे २४ वर्षांनंतर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जातात," असा टोला खडसेंनी लगावला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल तक्रार करणार आहे असे एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी बोदवड येथील गुन्ह्याबाबत दिलेली अधिकृत माहिती अशी की, "तक्रारदार ताराबाई यांनी ९ मार्च रोजी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिला होता. २००२ मध्ये मानकूर शिवारातील त्यांच्या जमिनीचा व्यवहार एका कारखान्यासाठी करण्यात येईल आणि त्यांच्या मुलांना तिथे रोजगार मिळेल, असे आश्वासन देऊन हा व्यवहार झाल्याची त्यांची तक्रार आहे. मात्र, नंतर ही जमीन वैयक्तिक नावावर करून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे."

"या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्यामार्फत करण्यात आली. चौकशीदरम्यान कागदपत्रांमध्ये 'खडाखोड' झाल्याचे आणि त्यात तथ्य असल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिल्यानंतर काल बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

"या गुन्ह्यामध्ये एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि तत्कालीन जिल्हा निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना आरोपी करण्यात आले आहे. तक्रारदार अनुसूचित जातीतील असल्याने, या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यातील सुधारित कलमे (Sumoto Amendment Sections) लावण्यात आली आहेत."

"फिर्यादीमध्ये जमिनीच्या प्रकाराबाबत (महार वतन किंवा अन्य) सविस्तर माहिती दिलेली नाही, मात्र कारखान्याच्या नावाखाली वैयक्तिक व्यवहार झाल्याचा मुख्य आरोप आहे. कागदपत्रांमधील फेरफार आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास पोलीस करणार आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news