

जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील बसस्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. मात्र गुरुवार (दि.14) रोजी मध्यरात्री या पूर्णाकृती पुतळ्याची संशयित अज्ञातांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनापासून (दि.15) रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. संशयितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. यावेळी शेंदुर्णी येथील बाजारपेठा स्वेच्छेने बंद ठेवण्यात आल्या असून स्वातंत्र्यदिनी शालेय व महाविद्यालयीन देशभक्तीपर कार्यक्रम झटपट पूर्ण करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. ग्रामस्थांमध्ये तीव्र आक्रोश दिसत असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहूर–जामनेर मार्गही आंदोलकांनी काही काळ रोखून धरला. या प्रकरणी शेंदुर्णी पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे. या विटंबनेच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवार (दि.16) रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे.