

जळगाव : एरंडोलच्या कृषी विभागाने आणि कासोदा पोलिसांनी कासोदा-पारोळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ सापळा रचून बोगस एच टी बी टी कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे ९,७५,२०० रुपयांच्या मुद्देमालासह एकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून, याचे धागेदोरे थेट धुळ्यापर्यंत पोहोचले आहेत.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एरंडोल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पथकाने ७ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता कासोदा-पारोळा रोडवर गस्त सुरू केली. साईबाबा मंदिराजवळ एका संशयास्पद मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 18- बी सी-6441 अडवून झडती घेतली असता, त्यात अवैध एच टी बी टी कापूस बियाण्याचे तब्बल ३९६ पाकिटे मिळून आली. या बियाण्यांची किंमत ४,७५,२०० रुपये इतकी असून, ५ लाखांची कार असा एकूण ९,७५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी योगेश बळवंत पाटील (वय २८, रा. सौदाणे, जि. धुळे) याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, हे बियाणे त्याने धुळ्यातील वाडी भोकर रोडवरील नितीन देवरे याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) निखिल राजेश टोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात बियाणे कायदा १९६६ च्या विविध कलमान्वये (कलम ७, ८, ९ आणि ६अ, ६ब) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना, विना बिलाचे बियाणे साठवून ठेवल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे. तपास अधिकारी पो.उप.निरी. धर्मराज वसंत पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, धुळ्यातील मुख्य सूत्रधार नितीन देवरे याच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.