Jalgaon Gulabrao Patil statement | बिहारी माणूस राबतो, मग टीका कशाला करता?
जळगाव : '"नोकऱ्या आहेत, पण आपली काम करण्याची मानसिकता नाही. बिहारी माणूस इथे येऊन पोट भरतो, मग त्यांच्यावर टीका कशाला करता?" असा थेट सवाल उपस्थित करत ना. पाटलांनी मराठी तरुणांना चांगलाच 'घरचा आहेर' दिला. विशेष म्हणजे, "हे बोलल्यामुळे तरुणांना राग आला तरी चालेल, निवडणुका अजून चार वर्षे लांब आहेत," जळगावचे पालकमंत्री आणि शिंदे गटाची मुलूखमैदान तोफ समजल्या जाणाऱ्या असे बेधडक वक्तव्य करत त्यांनी राजकीय गुगलीही ना.गुलाबराव पाटील यांनी केले. जळगाव जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित उद्योगांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावरून बोलताना गुलाबराव पाटलांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून तरुणांच्या मानसिकतेवर बोट ठेवले. यावेळी आपल्या खास गावरान शैलीत फटकेबाजी करताना पाटील म्हणाले, "मराठी तरुणांचा 'पिकअप' (Attitude) वाढला आहे. त्यांना शेती नको, एमआयडीसीत काम नको, कष्टाचे काम नको. फक्त आयत्या नोकऱ्या पाहिजेत. नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत असा फक्त बाऊ केला जातोय. पण प्रत्यक्षात कामं आहेत, कामं करण्याची दानत किंवा मानसिकता तरुणांमध्ये उरलेली नाही."
...तर राग येऊ द्या!
परराज्यातील मजुरांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, "एक बिहारी माणूस इथे येतो, काबाडकष्ट करून पोट भरतो आणि आपण त्यांच्या नावाने बोंबा मारतो. टीका कशाला करता? त्यांच्यासारखे कष्ट करण्याची तयारी ठेवा." आपल्या या वक्तव्यामुळे तरुण नाराज होतील, याची जाणीव असूनही पाटील थांबले नाहीत. उलट, " त्यांना राग आला तरी चालेल. आता काय निवडणूक नाही, ती अजून चार वर्षांनी आहे, तेव्हाच तेव्हा पाहू," असे सडेतोड स्वभावाचा परिचय दिला. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, बेरोजगार तरुणांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

