Jalgaon News | सत्तेच्या 'पाटी'खाली नियमांची पाटी कोरीच

जळगावात महापौर, उपमहापौरांसह साहेबांच्या गाड्यांवर 'बॅनरबाजी'; वाहतूक शाखा फक्त सामान्यांनाच नडणार का?
Jalgaon News
Jalgaon NewsPudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात आणि राज्यात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेवर लोकप्रतिनिधी विराजमान झाले खरे, पण पद मिळताच या 'माननीयांना' नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. महापौर, उपमहापौर असोत वा सभापती, आपल्या पदाचा रुबाब मिरवण्यासाठी गाडीच्या पुढे-मागे मोठमोठ्या पाट्या (बोर्ड) लावून शहरभर फिरत आहेत. विशेष म्हणजे, ज्यांनी नियमांचे रक्षण करायचे, त्या तहसीलदार आणि आयुक्तांच्या गाड्यांवरही 'पदनामाच्या' बेकायदा पाट्या झळकत आहेत. मग प्रश्न उरतो तो इतकाच की, वाहतुकीचे नियम काय फक्त सर्वसामान्य जळगावकरांच्या 'चलाना'साठीच आहेत का?

HSRP चा फज्जा; कारवाई कोणावाचून अडली?

शासनाने प्रत्येक वाहनासाठी 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) अनिवार्य केली आहे. क्रोमियम होलोग्राम आणि लेझर कोरीव पिन असलेल्या या नंबर प्लेटवर कोणताही बदल करणे किंवा त्यावर काहीही लिहिणे हा कायदेशीर गुन्हा आहे. आरटीओच्या नियमानुसार, नंबर प्लेटवर केवळ नोंदणी क्रमांक असणे बंधनकारक आहे. असे असतानाही जळगावात लोकप्रतिनिधींपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच नंबर प्लेटच्या वर किंवा खाली आपल्या पदाचे 'ब्रँडिंग' लावले आहे. हे नियमबाह्य असतानाही आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कायदे फक्त गरिबांसाठीच?

एकीकडे सामान्य नागरिकाची नंबर प्लेट थोडी जरी फॅन्सी असेल किंवा त्यावर काही लिहिलेले असेल, तर वाहतूक पोलीस तत्काळ अडवून दंडाची पावती फाडतात. मात्र, डोळ्यांसमोरून मोठ्या पदांच्या पाट्या लावून जाणाऱ्या आलिशान गाड्यांना सलाम ठोकण्यापलीकडे पोलीस काहीही करत नाहीत. लोकप्रतिनिधींना किंवा अधिकाऱ्यांना अशा पाट्या लावण्याची परवानगी कोणत्या नियमाने दिली? जर असा कोणताही नियम नसेल, तर मग या गाड्यांवर कारवाई करण्याचे धाडस प्रशासन का दाखवत नाही, असा संतप्त सवाल जळगावकर विचारत आहेत.

मिरवण्याची हौस नियमांच्या आड

नवे महापौर, उपमहापौर आणि सभापतींना आपल्या पदाचा देखावा करण्याची मोठी हौस असल्याचे सध्या जळगावच्या रस्त्यांवर दिसत आहे. पण ही हौस भागवताना आपण राजरोसपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत, याचे भान कोणालाच उरलेले नाही. प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून मिरवणारे आयुक्त आणि तहसीलदार तरी किमान कायद्याचा आदर करतील अशी अपेक्षा होती, पण तिथेही 'कुंपणानेशेत खाल्ल्याचा' प्रकार सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news