

जळगाव : जास्त गुण मिळवणे म्हणजेच यश नव्हे. सकारात्मकता आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली हेच खरे यश देते, असा संदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी अनुभूती निवासी शाळेच्या फाउंडर्स डे कार्यक्रमात दिला. थॉमस एडिसन हजार वेळा अपयशी झाला, पण प्रयत्न सोडला नाही. विद्यार्थ्यांनीही सातत्य टिकवले तर यश नक्की मिळते, असे करनवाल यांनी सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता, नैतिकता आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारे विविध कलाप्रयोग सादर केले. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी मानवी विचार, संवेदना आणि भावना यांची जागा घेऊ शकत नाही. तंत्रज्ञानाचा उपयोग माणसाच्या उत्कर्षासाठी व्हायला हवा, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. प्रमुख अतिथींमध्ये सीईओ मीनल करनवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्योती जैन, माजी मंत्री सतिश पाटील, गिमी फरहाद, अध्यक्ष अतुल जैन, डॉ. भावना जैन आणि प्राचार्य देबासिस दास आदी उपस्थित होते
भारतीय वारसा आणि जागतिक दृष्टिकोन यांचा संगम असलेल्या अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी ताणपुरा, तबला, बासरी, गिटार यांवर फ्युजन सादर केले. यावेळी ‘अंकुरअनुभूती’ आणि ‘संदेशअनुभूती’ या नियतकालिकांचे प्रकाशन झाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स या थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात ‘स्लो लाईफ अँड एआय’, ‘संज्ञानात्मक पूर्वग्रह आणि एआय’, ‘मेडिकेशन अँड एआय’, ‘आर्ट अँड एआय’ आणि ‘मानवी नातेसंबंध आणि एआय’ ही नाटके विशेष आकर्षण ठरली. व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रातील एआयचे परिणाम तसेच मानवी नात्यांवर होणारा प्रभाव विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला.
अकापेला, रोबोट डान्स, म्युझिकल योग आणि संगीत संयोजनाने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांची संशोधनवृत्ती आणि सामाजिक जाण भी स्पष्टपणे दिसून आली. कार्यक्रमादरम्यान कला विभागातील विद्यार्थ्यांनी थेट मंचावर चित्रनिर्मितीही केली.
माजी विद्यार्थी सार्थक मिश्रा आणि अंशिका गुर्जर यांनी शाळेने दिलेल्या नेतृत्वगुणांच्या आणि आत्मविश्वासाच्या अनुभवांची मांडणी केली. शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य देबासिस दास यांनी आभारप्रदर्शन केले. सूत्रसंचालन पलक सुराणा, श्रुती गर्ग, समृद्धी खंडेलवाल, कनक साबू, मुक्ती ओसवाल आणि अन्मय जैन यांनी केले.