

जळगाव : जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार (दि.29) दुपारी जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पालकमंत्री गुलाबराव पाटील, बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, अमोल पाटील तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू झाली.
बैठकीपूर्वी पोलिसांनी सर्वांचे ओळखपत्र तपासूनच प्रवेश देण्यात आला. पत्रकारांना मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशामुळे बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला. माननीय अजितदादा पवार यांचा आदेश आहे, पत्रकारांना प्रवेश नाही, असे सांगत पोलिसांनी उपस्थित सर्व पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. या निर्णयाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही होकार दिल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही पत्रकारांना प्रवेशबंदी देण्यात आली होती. शुक्रवार (दि.29) आजच्या बैठकीतही तशीच परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी फक्त फोटो काढण्यापूर्वीच पत्रकारांना परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा फक्त एकच आमदार असूनही जिल्हा नियोजन समितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव दिसून आला. जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे असतानाही नियोजन भवनात अजित दादांचे आदेश चालतात, हेच आजच्या बैठकीतील घडामोडीतून स्पष्ट झाले आहे.