AI in policing | एआय (AI) तंत्रज्ञान अन् पोलिसांची जिद्द; ८ वर्षांपूर्वी हरवलेली 'ती' चिमुरडी अखेर सापडली

भोंगऱ्या बाजारात शोधला ८ वर्षांचा 'दुवा'; जळगाव एएचटीयू (AHTU) पथकाची ऐतिहासिक कामगिरी
AI in policing
Published on
Updated on

जळगाव: २०१८ मध्ये एमआयडीसी परिसरातून अपहरण झालेली ९ वर्षांची चिमुरडीचा ८ वर्षांचा वनवास संपला अखेर नशिबाचे चक्र आणि पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे संपला आहे. ती हरवलेली मुलगी १६ वर्षांची झाली असून, जळगाव पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) तिचा शोध लावण्यात यश मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि गोपनीय माहितीच्या आधारे चक्क चोपडा तालुक्यातील 'भोंगऱ्या' बाजारातून या मुलीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

जळगाव जिल्ह्यातील ४ महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपासून बेपत्ता असलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. २०१८ मध्ये जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (गु. र. नं. ३५९/२०१८) ९ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल होता. गेल्या ८ वर्षांपासून पोलीस तिचा शोध घेत होते, मात्र यश येत नव्हते.

पोलिसांनी वापरले 'स्मार्ट' तंत्रज्ञान

ही मुलगी आता कशी दिसत असेल? हा सर्वात मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे आणि पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर यांनी यावर नामी शक्कल लढवली. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून २०१८ मधील त्या ९ वर्षांच्या मुलीची आजची संभाव्य चेहरेपट्टी तयार केली. या फोटोंचे अवलोकन करत असतानाच, त्यांना चोपडा तालुक्यातील कर्जाणे येथील भोंगऱ्या बाजारात एक मुलगी मिळून आल्याची माहिती मिळाली.

होळीच्या निमित्ताने कर्जाणे येथे भरलेल्या भोंगऱ्या बाजारात एक १५-१६ वर्षांची मुलगी बेवारस स्थितीत फिरत होती. तिला स्वतःचे नाव वा पत्ता सांगता येत नव्हता. एएचटीयू पथकातील पोहेकॉ दीपक पाटील यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला फोटो आणि समोर असलेली मुलगी यांची चेहरेपट्टी जुळवून पाहिली असता, ती २०१८ मध्ये हरवलेली मुलगीच असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने पथकाने कर्जाणे येथे धाव घेऊन तिला ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपो नि हरिदास बोचरे, पीएसआय दिनेश बडगुजर, विठ्ठल फुसे, दीपक पाटील, मनीषा पाटील, किरण धनगर आणि सलीम शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. ८ वर्षानंतर मुलीचा शोध लागल्याने पोलीस दलातून या पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सदर मुलीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news