

जळगाव : मध्यप्रदेशातील भिलट बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या दुचाकीला भरधाव बोलेरोने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना आज (रविवार) सकाळी सव्वासातच्या सुमारास अडावद ते चोपडा मार्गावरील शेतकी शाळेजवळ घडली.
मृतांची ओळख भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील महेंद्र शांताराम भोळे आणि युवराज तुकाराम तायडे अशी झाली आहे. हे दोघेही दुचाकीवरून भिलट बाबांच्या दर्शनासाठी मध्यप्रदेशात निघाले होते. दरम्यान, अडावदहून चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दोघेही घटनास्थळीच ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.