

जळगाव : विवाह सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असलेल्या वऱ्हाडींच्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि.10) सायंकाळी जामनेर रोडवर घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जामनेर तालुक्यातील टाकळी येथे लग्नासाठी फर्दापूर (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील वऱ्हाडी आले होते. 10 मे रोजी लग्न समारंभ आटोपल्यानंतर हे सर्वजण क्रुझर वाहनातून फर्दापूरकडे परत जात होते. मात्र, जामनेर रोडवरील हॉटेल रोहिणीसमोर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने क्रुझर पलटी झाली. या अपघातात दशरथ चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर लखिचद शंकर चव्हाण (50), मोहनदास शंकर जाधव (50), विक्रम मोतीलाल चव्हाण (25), बाबू पांचु जाधव (75), उखा दलू राठोड (65), धिरलाल सदू राठोड (65), हिरा महारु चव्हाण (58), प्रतीक प्रवीण राठोड (7) आणि भिवसिंग मनुर चव्हाण (75) हे सर्व रा. फर्दापूर ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.