

जळगाव : जिल्ह्यात काही संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील भाग असून त्यामध्ये भुसावळ बाजारपेठेचा समावेश होतो. भुसावळ बाजारपेठेत गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि नागरिकांच्या वर्दळीमुळे येथील रस्त्यांचा श्वास गुदमरतो आहे.
भुसावळ बाजारपेठ परिसरात दररोज सायंकाळी अमरदीप चौकापासून ते खडका चौफुलीपर्यंत वाहनचालक किंवा पादचारी यांना वर्दळीच्या रस्त्यामधून चालण्यासाठी रस्ता शोधण्याची वेळ येत आहे. याबाबत मात्र कोणतीही सक्षम यंत्रणा पुरेसे लक्ष पुरवित नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
जळगाव जिल्ह्यात रावेर, भुसावळ यासारखे अन्य विभाग संवेदनशील तर काही अतिसंवेदनशील भागात मोडतात. या ठिकाणी केवळ उत्सव काळातच पोलीस बंदोबस्त दिसून येतो. भुसावळ शहर हे रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण असून रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरच अमरदीप टॉकीज चौक ते खडका चौफुली हा मार्ग अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गातूनच राष्ट्रीय महामार्गाला जाणे सोईस्कर होते. खडका चौफुली व इतर गावांना देखील या मार्गाद्वारे प्रवास करावा लागतो. मात्र वर्दळीचा व वाढते अतिक्रमण यामुळे नागरिकांना या मार्गाने प्रवास करणे जिकीरीचे होते. दिवसापेक्षा सायंकाळपासून वर्दळ वाढत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण जाते तर पदचार्यांना पायी चालणे अवघड झाले आहे.
याबाबत वाहतूक पोलीसांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक शाखेचे कोणतेही नियंत्रण राहीलेले नाही किंवा वाहतूक शाखा कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. वाहतूक शाखेकडून नियमित ठरलेले पॉईंट व्यतिरिक्त पोलीस बंदोबस्त दिसून येत नाही. खडका रोड हा भाग संवेदनशील असूनही याठिकाणी कधीही पोलीस कारवाई होताना दिसून येत नाही.
सुभाष पोलीस चौकी व्यतिरिक्त या ठिकाणी पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. दररोज रस्त्यावर सायंकाळी चहाच्या टपऱ्या, खाऊचे ठेले, हॉकर्स आणि छोटे व्यापारी दुकाने लावून ठाण मांडलेले असतात. काही नागरिक नो पार्कींग ठिकाणी आपल्या दुचाकी रस्त्याच्या दुर्तफा लावून बिनधोकपणे गप्पा हाकतात. मात्र त्याकडे पोलीस यंत्रणेचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनधारक आणि वाढते अनधिकृत अतिक्रमण यावर कधी कारवाई होईल, परिसरातील रस्ता कधी मोकळा श्वास घेईल असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित हाेत आहे.