

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घराजवळ राहणाऱ्या तरुणीशी प्रेमविवाह केल्यानंतर तरुणीच्या माहेरच्या नातलगांनी विवाहानंतर सुमारे तीन ते चार वर्षांनी पतीवर हल्ला करीत खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव येथील पिंप्राळा हुडको, भीमनगर परिसरात रविवारी (दि. १९) सकाळी घडली. यात मुकेश रमेश शिरसाठ (२४) याचा खून झाला आहे. हल्लेखोरांनी मुकेशच्या नातलगांवरही शस्त्रांनी हल्ला करीत त्यांना दुखापत करीत दहशत केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेशचा भाऊ सोनू रमेश शिरसाठने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुकेश शिरसाठने ३ ते ४ वर्षांपूर्वी पूजाबरोबर पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. पूजा ही मुकेशच्या घराजवळच कुटुंबासह राहात होती. या विवाहानंतर पूजाच्या नातलगांचा मुकेशवर राग होता. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास मुकेश दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्यावेळी पूजाचे मावसकाका सतीश जुलाल केदार, भाऊ प्रकाश शंकर सोनवणे यांच्यासह सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले तसेच इतरांनी मुकेशवर हल्ला केला. पूजाशी प्रेमविवाह केल्याचा राग असल्याने संशयितांनी मुकेशवर हल्ला करीत कोयत्याने वार करीत जिवे मारले. मुकेशच्या मदतीसाठी भाऊ सोनूसह त्याची आई, वडील व इतर नातलग धावले असता संशयितांनी त्यांनाही मारहाण करीत हल्ला केला. यात सोनू शिरसाठही जखमी झाला, तर संशयितांविरोधात तक्रार करण्यास जाणाऱ्या नातलगांवरही संशयितांनी हल्ला केल्याचे सोनूने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तपास करीत सहा संशयितांना अटक केली आहे, तर एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच तीन संशयितांचा शोध सुरू केला आहे.
मुकेशच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. शिरसाठ कुटुंबीय हातमजुरीचे काम करून गुजराण करतात, तर पूजा व मुकेश दोघे एकाच समाजाचे असून प्रेमविवाह केल्याने पूजाच्या घरच्यांचा मुकेशवर राग होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाने प्रेमविवाह केल्यानंतर तिच्या नातलगांनी ती मेली असे गृहीत धरून तिच्या प्रतिमेवर हार लावला होता. नातलगांचा मुकेशवर राग असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुकेशच्या मित्राला मारहाण करीत मुकेशबरोबर राहात नकाे जाऊ असे धमकावले होते. त्यामुळे रविवारी सकाळी मुकेशने संशयितांना माझ्या मित्राला का मारले असा जाब विचारला होता. त्यानंतर दोन्ही गटांत बाचाबाची होऊन संशयितांनी धारदार शस्त्राने मुकेशवर वार करीत त्याचा खून केल्याचे समोर आले आहे.