

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात बुधवार (दि.24) रोजी आज कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत फक्त नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या किंवा इच्छुक उमेदवारांनाच प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी ओळखपत्र किंवा आधार कार्ड तपासल्यानंतरच आत सोडले जात आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासह संपूर्ण परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इमारतीसमोरील रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरच महानगरपालिकेचे खासगी सुरक्षा रक्षक तसेच पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे.
आरओ कार्यालयात जिथे नामनिर्देशन फॉर्म स्वीकारले व वितरित केले जात आहेत, याठिकाणीही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह पोलिस कर्मचारी संपूर्ण परिसरात बंदोबस्तावर आहेत.
निवडणूक उमेदवार किंवा नामनिर्देशन पत्र खरेदीसाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांनाच सकाळपासून प्रवेश देण्यात येत असून, शहरातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामासाठी दुपारी तीन वाजेनंतरच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे.