

जळगाव : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, माघारीच्या अंतिम मुदतीपूर्वी एकाच दिवसात ५६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये राजकीय पक्षांच्या ४ अधिकृत उमेदवारांसह ५२ अपक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मतदानापूर्वीच शिवसेनेने (शिंदे गट) तीन जागांवर बिनविरोध विजयाची ‘हॅट्रिक’ साधली असून, भारतीय जनता पक्षानेही एका जागेवर खाते उघडले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला अवघा एक दिवस शिल्लक असताना गुरुवारी (१ जानेवारी) दिवसभर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला होता. प्रभाग ४ 'क' मधून समाजवादी पक्ष, प्रभाग ७ 'क' मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रभाग १५ 'ब' मधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि प्रभाग १८ 'अ' मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली. मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता प्रमुख पक्षांमधील लढतींचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. दिवसभर राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांमध्ये 'पडद्यामागच्या' चर्चा आणि खलबते सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जळगाव मनपाच्या रणांगणात मतदानापूर्वीच काही जागांचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. आतापर्यंतच्या प्रक्रियेत शिवसेनेचे (शिंदे गट) ३ उमेदवार, तर भाजपचा १ उमेदवार अशा एकूण ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत.
शिवसेना (शिंदे गट): प्रभाग १८ (अ) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे, प्रभाग ९ (अ) मधून मनोज चौधरी आणि प्रभाग ९ (ब) मधून प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
भाजप : प्रभाग १२ (ब) मधून भाजपच्या उज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडींची अधिकृत घोषणा तांत्रिकदृष्ट्या मतमोजणीच्या दिवशी होणार असली, तरी रिंगणात अन्य उमेदवार नसल्याने या जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत.
२ जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उरलेल्या काही तासांत आणखी किती उमेदवार माघार घेतात आणि किती प्रभागांमध्ये चौरंगी किंवा थेट लढत होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. काही दिग्गज नेत्यांनी बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले असून, त्याचे परिणाम आज दुपारी ३ वाजेपर्यंत स्पष्ट होतील.