जळगाव महापालिकेला ४२ कोटींचा गंडा! मुंबईच्या बड्या कंपनीवर गुन्हा दाखल

१९९७ पासूनचा रस्ते घोटाळा; शहर हादरले
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

​जळगाव: रस्ते कामाचा ठेका घेऊन तो मुदतीत पूर्ण न करता, विश्वासघात करत महानगरपालिकेची तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या 'अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.' वर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ मे रोजी रात्री उशिरा दाखल झालेल्या या गुन्ह्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, मे. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. (संचालक: राझू अंबालाल बारोट, रा. अंधेरी, मुंबई) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी नगरपरिषद (सध्याची महानगरपालिका) काळातील रस्ते कामाचे कंत्राट घेतले होते.

​१९९७ पासूनचा 'खेळ'

आरोपी कंपनीने नगरपरिषदेकडून पेव्हर मशीनच्या सहाय्याने डांबरीकरण करण्याची निविदा मिळवली होती. कराराप्रमाणे काम करणे बंधनकारक असतानाही, त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण केले नाही. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करत, प्रशासनाचा विश्वास संपादन करून त्यांनी 'मोबिलायझेशन फंड' लाटला. यामध्ये मूळ मुद्दल, त्यावर आलेले व्याज आणि महापालिकेने केलेला खर्च असा एकूण ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपयांचा आर्थिक फटका महापालिकेला बसला आहे. हा प्रकार २० मार्च १९९७ पासून ते १ एप्रिल २००६ या दीर्घ कालावधीत घडला आहे.

​ईओडब्ल्यूकडे तपास

जळगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (लोकसेवकाने केलेला विश्वासघात) आणि ४२० (फसवणूक) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या रकमेचा घोटाळा उघडकीस आल्याने आता या प्रकरणातील 'मूळ सूत्रधारांवर' कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news