

Gutkha Seized Muktainagar
जळगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. बोदवड चौफुली परिसरात मंगळवारी (दि. ६) केलेल्या या कारवाईत एका तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून प्रतिबंधित पानमसाला, जर्दा आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष आडसूळ यांना ६ ऑक्टोबर रोजी बोदवड चौफुलीमार्गे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून चौफुली परिसरात वाहन तपासणी सुरू केली.
दरम्यान, महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एचआर-८४-१०७३) संशयास्पदरीत्या आढळून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबविता पुढे नेले. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले आणि झडती घेतली.
झडतीदरम्यान वाहनात प्रिमियम राजनिवास सुगंधित पानमसाल्याची ६ हजार ७५० पाकिटे, किंमत १० लाख १२ हजार ५०० रुपये, तसेच प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्द्याची ६ हजार पाकिटे, किंमत ५ लाख ७६ हजार रुपये, असा प्रतिबंधित साठा आढळून आला. याशिवाय ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १९ लाख १३ हजार ५०० रुपये आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभमसिंग (वय २५, रा. निनावा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.
जप्त केलेला गुटखा व पानमसाला कोठून आणण्यात आला, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या तस्करीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र धनगर व प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली.