

जळगाव : शहरात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून एका गॅरेज मॅकेनिकला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सलग मोटारसायकल चोरीचे प्रकार होत होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी देण्यात आली. तपासादरम्यान गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या पथकाने माजिदअली लियाकतअली, (रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर) याला ताब्यात घेतले. आरोपी हा गॅरेज मॅकेनिक असून त्याला वाहनांची चांगली माहिती असल्याचा गैरफायदा घेत तो चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
शनिवार, दि. ६ डिसेंबर रोजी संशयिताला उस्मानिया पार्क परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.