जळगाव
जळगाव जिल्ह्यात खरीप पणन हंगामासाठी केंद्र व त्यांच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. Pudhari News Network

Jalgaon Millet Grain News : खरीप पणन हंगामासाठी खरेदी केंद्र व मूलभूत किंमती जाहीर

शेतकऱ्यांनी केंद्रांवर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Published on

जळगाव : जळगाव जिल्ह्यात खरीप पणन हंगामासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी, भरड धान्य, मुग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी केंद्र व त्यांच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकऱ्यांना या केंद्रांवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दरानुसार नाफेडमार्फत मूग, उडीद व सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची ही नोंदणी 30 ऑक्टोबरपर्यंत होईल, तर प्रत्यक्ष खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

असे आहेत दर दर ...

  • मूग: 8,767 रूपये प्रती क्विंटल

  • उडीद: 7,800 रूपये प्रती क्विंटल

  • सोयाबीन: 5,328 रूपये प्रती क्विंटल

या खरेदीसाठी अमळनेर, चोपडा, कासोदा, म्हसावद, जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव येथे केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आतापर्यंत 876 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकरी या केंद्रांवर प्रत्यक्ष किंवा मोबाईल ॲपद्वारेही नोंदणी करू शकतात.

पणन महासंघातर्फे ज्वारी, मका, बाजरी व भरड धान्य खरेदी 27 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या पिकांसाठीचे जाहीर दर असे ..

  • ज्वारी: 3,699 रूपये प्रती क्विंटल

  • मका: 2,400 रूपये प्रती क्विंटल

  • बाजरी: 2,775 रूपये प्रती क्विंटल

या खरेदीसाठी अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, पारधी, एरंडोल, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, वडगाव व चाळीसगाव येथे 18 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर एफएक्यू दर्जाचे धान्य खरेदी केंद्रावर आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रार असल्यास शेतकरी संबंधित पणन अधिकारी, पोलिस प्रशासन, डी.डी.आर. कार्यालय किंवा तालुक्यातील तहसीलदारांकडे तक्रार नोंदवू शकतात. अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, पणन महासंघाचे अध्यक्ष आणि डी.डी.आर. अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news