Jalgaon Crime : मेहुणबारे बोगस विमा प्रकरणाच्या तपासासाठी 'एसआयटी' स्थापन; पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश!

​अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या देखरेखीखाली ६ अधिकाऱ्यांचे विशेष पथक; गुजरात हत्याकांडाचे धागेदोरे उकलणार?
Jalgaon Crime : मेहुणबारे बोगस विमा प्रकरणाच्या तपासासाठी 'एसआयटी' स्थापन; पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेश!
Published on: 
Updated on: 

​जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या १० लाखांच्या बोगस विमा फसवणूक प्रकरणाचे गांभीर्य आणि गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड या पथकाचे पर्यवेक्षण करणार आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा गुजरातमधील बारडोली येथे उकाई कालव्यात फेकून दिल्याने संशयास्पद अंत झाल्याने या 'एसआयटी' तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

​अशी आहे ६ अधिकाऱ्यांची 'एसआयटी'

मेहुणबारे पोलिस ठाण्यात १९ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ६१(२) अन्वये गुन्हा (र.नं. ३५२/२०२६) दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील उपलब्ध पुरावे आणि व्याप्ती पाहता पोलिस अधीक्षक धिवरे यांनी ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गठीत केले आहे

​अशोक नखाते (अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव) - पर्यवेक्षण अधिकारी

​विजयकुमार ठाकुरवाड (उपविभागीय पोलिस अधिकारी, चाळीसगाव) - पर्यवेक्षण अधिकारी

​श्रीमती सह्याद्री बिर्ले (परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी, मेहुणबारे) - तपास अधिकारी

​प्रशांत दरेकर (परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक) - सदस्य

​राहुल गायकवाड (पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) - सदस्य

​नितीन पाटील (सहायक पोलिस निरीक्षक, वाचक अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव) - सदस्य

​दर १० दिवसांनी सादर करावा लागणार प्रगती अहवाल

या प्रकरणात तत्कालीन तपासी अंमलदाराचाही सहभाग उघड झाल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली होती. त्यातच या गुन्ह्यातील मुख्य संशयित एरंडोल येथील नितीन हिंमत पाटील आणि कविता संजय पाटील यांचा सुरत जिल्ह्यातील बारडोलीनजीक उकाई कालव्यात फेकून दिल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विमा फसवणुकीचे धागेदोरे थेट गुजरात हत्याकांडापर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाचा सखोल उलगडा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तपास अधिकारी श्रीमती सह्याद्री बिर्ले यांनी या गुन्ह्याच्या तपासाबाबत वेळोवेळी अवगत करून दर १० दिवसांनी प्रगती अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहेत.