Jalgaon mayor | जळगावच्या महापौरपदासाठी 'फिल्डिंग' सुरू! बेंडाळे-काळे यांची महाजनांच्या दरबारी धाव; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

​आमदार भोळे, मंगेश चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज होणार महत्त्वाची बैठक; नव्या-जुन्यांच्या वादात भाजप कोणाला संधी देणार?
Jalgaon mayor news
Jalgaon mayor news
Published on
Updated on

जळगाव: जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या गटनेत्यांनी प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी खरी चुरस 'उमेदवारी' मिळवण्यात आहे. मंगळवारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका उज्वला बेंडाळे आणि दीपमाला काळे यांनी थेट नामदार गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, या दोघींपैकी एकाच्या नावाची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाजनांच्या भेटीने वाढली धाकधूक

महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपच्या माजी महानगर अध्यक्ष उज्वला बेंडाळे आणि नगरसेविका दीपमाला काळे यांनी गिरीश महाजन यांची घेतलेली भेट ही केवळ साधी भेट नसून ती 'फिल्डिंग'चाच भाग असल्याचे मानले जात आहे. या भेटीमुळे महापौरपदाच्या रेसमध्ये या दोन नावांची आघाडी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

​आज होणार 'फायनल' निर्णय

या निवडीबाबत माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, "जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण आणि मी स्वतः आज एक महत्त्वाची बैठक घेणार आहोत. या बैठकीत सर्व बाबींवर चर्चा करूनच महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले जाईल." विशेष म्हणजे, भाजपमध्ये या नावावरून कोणतेही दुमत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

​नव्या-जुन्या पेक्षा 'क्षमता' महत्त्वाची

महापौरपदासाठी अनुभवी चेहरा हवा की नवीन, या प्रश्नावर महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली. "अनुभवी की नवा चेहरा, हा विषय आमच्यासाठी गौण आहे. बैठकीमध्ये सर्व उमेदवारांची क्षमता तपासली जाईल आणि त्यानंतरच शिक्कामोर्तब होईल," असे त्यांनी सांगितले. तसेच, महापौरांचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल, हे देखील आजच्या बैठकीतच ठरणार आहे.

​नाशिक-धुळ्यावरही लक्ष

केवळ जळगावच नाही, तर नाशिक आणि धुळे येथील महापौरपदाच्या निवडीबाबतही गिरीश महाजन सक्रिय झाले आहेत. नाशिकला उद्या भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील या तिन्ही शहरांच्या सत्तेच्या चाव्या फिरवण्यात महाजनांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news