

जळगाव : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने भवरलाल ॲण्ड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने विशेष वाड्:मय व नाट्य पुरस्कार वितरण सोहळा डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह येथे संपन्न झाला. यावर्षीचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्:मय पुरस्कार ‘फुलटायमर’ या ग्रंथासाठी अण्णा सावंत (जालना) यांना, तसेच नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मराठी रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यगिरीसाठी अजित दळवी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला.
प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील (अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आसाराम लोमटे (परभणी) उपस्थित होते. तसेच भवरलाल ॲण्ड कांताबाई फाउंडेशनच्या वतीने जैन इरिगेशन सिस्टम लि. च्या मीडिया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी उपस्थित होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाहक दादा गोविंदराव गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळूंखे, सहकार्यवाहक गणेश मोहिते व इतर पदाधिकारीही या सोहळ्यास उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाल्यानंतर सत्कारमूर्तींना सन्मानित २५ हजार रुपयांचा धनादेशासह २०२५ चे दोन विशेष वाड्म:य पुरस्कार प्रदान करण्यात आले. रसिक व अभ्यासकांनी या पुरस्कार वितरण समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
डॉ. आसाराम लोमटे यांनी ‘फुलटायमर’ ग्रंथ व अजित दळवी यांच्या नाट्य योगदानाविषयी भाष्य केले. ‘फुलटायमर’ हे आत्मकथन नसून चळवळींचा ऐवज सांगणारे ग्रंथ आहे. हे पुस्तक समाजावर आलेल्या बदलांवर भाष्य करते. तसेच, अजित दळवींच्या नाट्यकृती सामाजिक मूल्य व्यवस्थेवर प्रकाश टाकतात. सध्याच्या काळात विचारप्रधान नाटकांची गरज असून, ‘गांधी विरुद्ध गांधी’सारख्या अभ्यासपूर्ण नाटकांनी दळवी वेगळे ठरतात, असे लोमटे म्हणाले.
यावेळी अण्णा सावंत यांनी मनोगतात म्हटले की, फक्त आर्थिक लढ्याने भागत नाही, तर सामाजिक व सांस्कृतिक संघर्ष गरजेचा आहे. ‘फुलटायमर’मध्ये गेल्या ७०-७५ वर्षांतील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व जातीय अस्मितांचा वस्तुनिष्ठ इतिहास मांडला आहे. समाजातील परिवर्तन, माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तीत झालेले बदल, चळवळींचे संकुचित होत जाणे आणि जात-धर्म जाणिवेच्या मर्यादा यांचा वेध या ग्रंथात घेतला आहे.
प्रा. अजित दळवी यांनी नाट्य प्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. ‘मीराबाई’, ‘काय द्यायचं बोला..’, ‘तुकाराम..’, ‘आजचा दिवस माझा..’, ‘दुसरी गोष्ट..’ यांसारख्या नाटकांची चर्चा करताना त्यांनी आजच्या परिस्थितीवर बोलणे कठीण असले तरी काही नवीन लेखक या परिस्थितीचा अभ्यास करत असल्याचा आनंद व्यक्त केला. डॉ. विष्णू सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दिलीप बिरुटे यांनी परिचय व प्रास्ताविक केले.