

जळगाव : जैन हिल्स परिसरात लागवड केलेल्या दुर्मीळ व चविष्ट आंब्यांच्या १५० हून अधिक जातींचे ‘मॅंगो फिस्टा’ हे भव्य प्रदर्शन शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या दालनात सुरु झाले असून, याचे औपचारिक उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फित कापून झाले.
कार्यक्रमाप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालक अजित आणि अतुल जैन, अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेडचे संचालक अथांग, अंबिका, अभंग आणि आत्मन जैन, आंतरराष्ट्रीय आंबा तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुंजाटे, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के., डॉ. अनिल पाटील तसेच कृषी विभागाचे अजय काळे, नितीन पाटील, शंकर गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या शेती संशोधन व प्रात्यक्षिक केंद्रातर्फे आयोजित या प्रदर्शनात भारतातील तसेच थायलंड, मेक्सिको, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राईलमधील आंब्यांच्या नामांकित १५० पेक्षा अधिक प्रजाती पाहायला मिळतात.
त्यात जैन इरिगेशनने संशोधित केलेल्या टिश्यूकल्चर आणि हायब्रीड (संकरित) 34 जातींचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंबा प्रदर्शन
दुर्मीळ आणि उत्कृष्ट चव असलेल्या व्हरायटी एकाच छताखाली
संशोधित आंब्यांचा प्रत्यक्ष अनुभव
प्रदर्शनास जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हे आंबा प्रदर्शन २२ मे रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले आहे. जळगावकरांनी या ‘मॅंगो फिस्टा’ला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.