

जळगाव : रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथे हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका ६२ वर्षीय व्यक्तीने तरूणाच्या गळ्यावर मिस्त्री कामाच्या ग्राइंडर मशीनचे कटर फिरवून निर्घृण खून केल्याची घटना घडली. ही घटना इंदिरा नगर भागात मंगळवारी (दि.६) दुपारी २ च्या सुमारास घडली.
राजू रवींद्र कापडे (वय २३, रा. इंदिरा नगर, केऱ्हाळे) असे मृताचे नाव असून याप्रकरणी रामसिंग चिंधू भिल (वय ६२ वर्ष, रा. इंदिरा नगर, केऱ्हाळे) याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामसिंग भिल हा मिस्त्रीचे काम करतो आणि तो गावात एकटाच राहतो. मृत राजू हा आरोपीला रोज जेवणाचा डब्बा आणून देण्याचे काम करायचा. त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती.
आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास दोघेही दारूच्या नशेत होते. राजू आरोपी रामसिंग याच्या घरी गेला होता. तिथे कोणत्यातरी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला गेल्याने नशेत धुंद असलेल्या रामसिंगने घरातील मिस्त्री कामाचे ग्राइंडर मशीन उचलले आणि त्याच्या कटरने थेट राजूला संपवण्यासाठी त्याच्या गळ्यावर वार केला. या हल्ल्यात राजूचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रामसिंगला ताब्यात घेतले आहे. घटनेदरम्यान झालेल्या झटापटीत किंवा मारहाणीत आरोपी रामसिंग याला देखील दुखापत झाल्याचे समोर आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रावेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून क्षुल्लक कारणावरून उमद्या तरुणाचा बळी गेल्याने केऱ्हाळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.