

जळगाव : एककीकडे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन बाजारपेठ पेटली असताना, त्याचे थेट चटके आता जळगावच्या सर्वसामान्यांना बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संघर्षामुळे एलपीजी गॅस आणि इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, जळगाव शहरात गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांच्या मैलोन्मैल रांगा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांत गॅसचे दर ६० रुपये किलोवरून थेट ८५ रुपयांवर पोहोचल्याने रिक्षाचालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जळगावचा पारा सध्या ४० अंशांच्या पार गेला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात तासान् तास रांगेत उभे राहूनही गॅस मिळेलच याची खात्री नसल्याने रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत. शासनाकडून होणारा पुरवठा वेळेवर होत नसल्याचा फटका हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने धंदा करायचा कधी? आणि कुटुंबाचे पोट भरायचे कसे? असा आर्त सवाल या कष्टकऱ्यांकडून विचारला जात आहे.
आखाती देशांमधील युद्धाचा बहाणा करून इंधन कंपन्यांनी टंचाई निर्माण केल्याची चर्चा आहे. जळगाव शहरात सीएनजी आणि एलपीजी पंपांवर पहाटेपासूनच रिक्षांच्या रांगा लागत आहेत. गॅसचे दर वाढल्याने रिक्षा भाडेवाढ करावी की नाही, या कात्रीत चालक अडकले आहेत. "पूर्वी ६० रुपयांना मिळणारा गॅस आता ८५ रुपये झाला आहे, त्यात रांगेत उभे राहिल्याने दिवसातील चार तास वाया जातात, मग आम्ही कमवायचे काय?" अशी संतप्त प्रतिक्रिया एका रिक्षाचालकाने व्यक्त केली.
गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असताना स्थानिक प्रशासनाने यामध्ये हस्तक्षेप करून हा पुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे. मात्र, प्रशासन आणि शासन या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर जळगावमधील रिक्षाचालक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.
आम्ही रिक्षा चालक गॅसमुळे त्रस्त झालेला होता वेळेवर गॅस मिळत नाहीये त्यामुळे गॅस भरण्यासाठी रांगा लागलेल्या दिसून येत आहे त्यात गॅसचा भडका उडालेला दिसून येत आहे तरी शासनाने याकडे लक्ष द्यावे.
रमेश दत्तू सोनार रिक्षा चालक जळगाव शहर
गॅसचा भडकवला असल्यामुळे टाचणतास गॅस भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते परंतु गॅस मिळत नाहीये शासनाने गॅसचा पुरवठा सुरळीत करा म्हणजे गॅस भरण्यासाठी वेळ लागणार नाही.
गजानन दगडू सुरवाडे रिक्षा चालक