

जळगाव : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे असून गेल्या कित्येक दिवसांपासून प्राधिकरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर शहरात प्रवेश करताच कालिका माता चौफुलीतील धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 या महामार्गावर अजिंठा चौफुली, इच्छा देवी व आकाशवाणी असे मोठे तीन चौक आहेत. तर येथील ओव्हर ब्रिजचे काम देखील अनेक दिवसापासून रखडलेले आहे. सदर रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरण करत नसल्याने शहरवासियांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरात दाखल होणाऱ्या वाहनांना देखील या राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या खड्ड्यांनीच स्वागत होत असल्याने वाहनधारकांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वारंवार रस्ताकांमाप्रती दुर्लक्ष करीत असल्याने शहरात प्रवेश होताच खड्डेमय कालिका माता चौफुली ही वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे.
या राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक व इच्छा देवी चौक या चौफुल्या असून अजिंठा चौफुलीवर कायम वर्दळ असते. शिवाय रस्त्यावर एकही वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारकांना या वर्दळीतून आपला जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. तसेच महामार्गावरील ओव्हर ब्रिजचे कामाचा प्रस्ताव मंजूर असताना व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यात असताना अद्यापही ब्रिजचे काम झालेले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याचे काम पूर्णत्वास नेत नाही किंवा सार्वजनिक बांधकामाकडेही हा रस्ता हस्तांतरित करत नाही. किमान ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाल्यास वाहतूकीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
शहरात प्रवेश करतानाच कालिका माता चौफुली या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे वाहनधारकांचे स्वागत करत आहे. पावसाळा सुरू झालेला असतानाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजविण्यास गंभीर नाही. त्यामुळे संभाव्य अपघात झाल्यास त्यास कोण जबाबदार ठरेल असा प्रश्न उपस्थित होतो. महामार्गावरील भुसावळकडून येणारी वाहने व जुन्या जळगाव कडून जाणारी वाहने तसेच शहरात दाखल होणारी वाहने कालिका माता त्रिफुली होत असल्याने हे एक अपघाताचे केंद्र व धोकादायक त्रिफुली बनली आहे.
सदर रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ताब्यात असून आमदार सुरेश भोळे यांनी काही कामे मंजूर करून घेतलेली आहेत. मात्र या रस्त्यावरील मुख्य वाहतुकीच्या समस्येसाठी प्रस्तावित ओव्हर ब्रीजसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी अजूनही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्याकडे वर्ग केलेले नसल्यामुळे ते कामे अद्याप झालेले नाहीत.
- प्रशांत सोनवणे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव.
तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव कार्यालयाच्या संचालक शिवाजी देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत मौन पाळले आहे.