

Jamner Agriculture Officer Vehicle Fire
जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला आग लावण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. कृषी मंडळ अधिकारी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनाला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केल्याची माहिती समोर आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
माहितीनुसार, जामनेर येथील कृषी विभागाच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला अचानक आग लागली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेची पुष्टी जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी तसेच जामनेर पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू आहे. अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाहनाला आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना अपघाती आहे की हेतुपुरस्सर घडवून आणण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
राज्याचे मंत्री व जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात कृषी विभागाच्या शासकीय वाहनाला आग लागल्याच्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.