

जळगाव : गेल्या आठ वर्षांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावने सातत्याने प्रगती साधत रुग्णसेवेत आमूलाग्र बदल घडवले आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. रुग्णांसाठी अत्याधुनिक थ्री टेस्ला एमआरआय मशीनच्या सुविधेचा लोकार्पण सोहळा शनिवारी (३ मे) सकाळी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन होते. प्रमुख उपस्थिती खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी मान्यवरांची होती.
रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. मारोती पोटे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांत एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन यांसारख्या सर्व सुविधा सुरू झाल्या असून आता थ्री टी एमआरआय मुळे रेडिओलॉजी विभाग अधिक सक्षम झाला आहे. सध्या ही सुविधा रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी असून लवकरच ओपीडी रुग्णांसाठीही उपलब्ध होणार आहे. ही यंत्रणा केंद्र व राज्य शासनाच्या ईडब्ल्यूएस योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उपलब्ध झाली आहे.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी अद्ययावत यंत्रणांची प्रशंसा करत रुग्णसेवेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आमदार भोळे व खासदार वाघ यांनी रुग्णसेवेमधील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, आता जिल्ह्यातील रुग्णांना अल्पदरात एमआरआय सुविधा मिळेल, ज्यामुळे आर्थिक भार कमी होईल.
कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रमोहन हरणे, डॉ. इम्रान पठाण, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. संजय चौधरी, जयश्री जोगी यांच्यासह डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलेश बारी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी आभार मानले.