

जळगाव : शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी राज्यात निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान 5 मार्च ते 30 जून या कालावधीत राबविण्यात येणार असून इयत्ता दुसरी ते पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमतांची पडताळणी करून विद्यार्थिनीहाय उपक्रम राबवून सदर अभियान यशस्वी करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी जिल्हास्तरीय आढावा सभेत केले.
जळगाव शहरातील सर्व खाजगी प्राथमिक शाळा, सर्व माध्यमिक शाळा व नगरपालिका शाळांमधील शिक्षकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत विकास पाटील बोलत होते. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाबाबत कार्यवाही करणेबाबत शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांना सूचित केले. कार्यक्रमाचे आयोजन जळगाव मनपा प्रशासनाधिकारी खलील शेख यांनी केले. मनपा क्षेत्रातील सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक कार्यशाळाला उपस्थित होते.
"निपुण भारत" कृति कार्यक्रम हा मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान सुधारण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक महत्त्वाचा उपक्रम असून या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
शिक्षकांचे सक्षम प्रशिक्षण देण्यात येत असून आजचे कार्यशाळा म्हणजे त्याचा भाग आहे. नवीन अध्यापन तंत्रे, डिजिटल साधने आणि बालशिक्षण तंत्रज्ञान यांचा वापर शिकवण्यात करावा.
शिक्षकांनी मूलभूत शिक्षण सुधारण्याच्या पद्धतींमध्ये पारंगत व्हावे.
विद्यार्थी-केंद्रीत अध्यापन: प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या गतीनुसार वैयक्तिक लक्ष द्यावे. विद्यार्थ्याला आपले दैवत म्हणून व त्याच्या भावनिकतेचा विचार करून त्याला अध्यापन करावे.
कथाकथन, खेळ आणि कृती-आधारित शिकवणीसारख्या सहभागात्मक पद्धतींचा अवलंब करावा.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी लायब्ररी आणि वाचन उपक्रम घेण्यात यावेत.
तांत्रिक साधनांचा वापर
ई-लर्निंग प्लॅटफॉर्म, व्ही एस के ॲप्स चा आणि डिजिटल कंटेंटचा अध्यापनात समावेश करावा.
विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल शिक्षण साहित्य विकसित करण्यात आले असून त्याचा नियमित अध्यापनात व विद्यार्थ्यांचे अध्ययनात वापर करून घ्यावा.
मूल्यमापन आणि प्रगतीचा आढावा घेण्यात येणार असून विद्यार्थी जसजसे अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल चावडी वाचन व गणन कार्यक्रमात सादर करणे अपेक्षित आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विकसित केलेल्या साहित्याचा संदर्भ साहित्याचा अध्ययन साहित्याचा वापर प्रभावीपणे करावा.
सर्व शिक्षक त्यांच्या वर्गाची नोंदणी विद्या समीक्षा केंद्राच्या ॲपवर करतील व त्याच ठिकाणी सदर कार्यक्रमाची उपक्रम निहाय नोंदणी देखील करणे अपेक्षित आहे.