

जळगाव : जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी तीव्र निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तानी ध्वज आणि आतंकवादीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि विविध सामाजिक संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी "पाकिस्तान मुर्दाबाद", "आतंकवाद्यांना ठेचून काढा" अशा संतप्त घोषणा देत तीव्र भावना व्यक्त केल्या.
पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तब्बल 27 पर्यटक ठार झाले असून, धर्म विचारून आणि गोळ्या झाडून हे हत्याकांड करण्यात आले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तालुका स्तरावरही पाकिस्तान आणि आतंकवादाचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. जळगाव शहरात झालेल्या आंदोलनात भाजप व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवत, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक पुतळा व ध्वज दहन करत रोष व्यक्त केला.