

जळगाव: शहरातील एमआयडीसी परिसरात एका हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल कुंटणखान्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. बुधवारी (दि.२०) सायंकाळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तीन पीडित महिलांची सुखरूप सुटका केली असून, हॉटेल मालक आणि दोन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
एमआयडीसी परिसरातील एच सेक्टरमध्ये असलेल्या 'हॉटेल तारा'मध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने सापळा रचला.
पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला हॉटेलमध्ये पाठवले. ठरलेल्या संकेतानुसार, ग्राहकाने खोलीत प्रवेश करताच दोन वेळा लाईट बंद-चालू करून बाहेर थांबलेल्या पथकाला इशारा दिला. हा इशारा मिळताच क्षणाचाही विलंब न लावता पथकाने हॉटेलवर धडक कारवाई केली. या धाडसी कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली, तर घटनास्थळावरून हॉटेल मालकासह दोन ग्राहकांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरात अशा प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.