Jalgaon Heavy Rain : जळगाव जिल्ह्यात धुँवांधार! अमळनेरात एका महिन्याच्या बाळाला टबमधून वाचवले तर बात्सर येथे ८ जणांची सुटका

​गांधी मार्केटच्या बेसमेंटमध्ये साचले पाणी; बोदवड, भुसावळ आणि यावलमध्येही पूरपरिस्थिती, ​आमदार आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत भडगावमध्ये बचाव कार्य यशस्वी; धरण-धबधब्यांकडे न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
जळगाव जिल्ह्यात धुँवांधार!
जळगाव जिल्ह्यात धुँवांधार!
Published on
Updated on

​जळगाव : गेल्या २४ तासांपासून जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे कुठे घरात पाणी शिरले, तर कुठे नद्या-नाल्यांना उधाण आले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत अमळनेर आणि भडगाव तालुक्यातील घटनांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करत अनेक जीवांना सुखरूप बाहेर काढले आहे.

​अमळनेरात १ महिन्याच्या बाळाची थरारक सुटका!

​अमळनेर शहरातील भालेराव नगर, गुरुकृपा कॉलनीत नाल्याला आलेल्या भीषण पुरामुळे पाणी घरात शिरले. घरात छातीपर्यंत पाणी साचल्याने एका कुटुंबातील अवघ्या १ महिन्याचे बाळ, तीन महिला आणि तीन लहान मुले खाटेवर उभी राहून जीव वाचवण्यासाठी धडपडत होती. घटनेची माहिती मिळताच पालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तात्काळ पथक रवाना केले.

​पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगात असल्याने आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, अग्निशमन कर्मचारी फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका संदांनशीव व पवन बिऱ्हाडे यांनी दोर आणि लाईफ जॅकेटच्या मदतीने मानवी साखळी तयार केली. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पथकाने पीडित कुटुंबापर्यंत पोहोचून एका महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये अलगद ठेवून आणि इतर सर्व सदस्यांना सुरक्षितपणे शेजारील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचवले. या बहाद्दरीचे संपूर्ण अमळनेर शहरात कौतुक होत आहे.

​बात्सर येथे ५ लहान मुलांसह ३ महिलांना काढले सुखरूप

​भडगाव तालुक्यातील मौजे बात्सर येथे अचानक पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने एक कुटुंब घरात अडकून पडले होते. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि भडगावच्या तहसीलदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत थरारक बचाव कार्य राबवून ५ लहान बालके आणि ३ महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्वांची गावातच निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात धुँवांधार!
Jalgaon rain update: जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; पालकमंत्री

​जळगावचे गांधी मार्केट पाण्याखाली, बोदवड व भुसावळात धावपळ

​जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी मार्केटच्या बेसमेंटमधील सर्व दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दुकाने बंद ठेवावी लागली, तर काहींनी खबरदारी घेत व्यापार सुरू ठेवला. ​दुसरीकडे, भुसावळ आणि बोदवड शहरांमध्येही विविध भागांत पाणी साचल्याने नगरपालिकेच्या यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. कचरा हटवणे, नाल्यांतील अडथळे दूर करणे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी पथके कार्यरत आहेत.

​धरणे आणि धबधबे प्रवाहित; पर्यटकांना सतर्कतेचा इशारा

​यावल तालुक्यातील वड्री व निंबा देवी धरण परिसरात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. प्रसिद्ध मनू देवी धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. धोका ओळखून प्रशासनाने धरण परिसर, धबधबे, नद्या-नाले आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर न जाण्याचे तसेच अनावश्यक वावर टाळण्याचे कडक आवाहन नागरिकांना व पर्यटकांना केले आहे.

​जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news