

Girna River Sand Mining Raid
जळगाव : गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात महसूल आणि पोलिस प्रशासनाने मध्यरात्री संयुक्त मोहीम राबवून वाळू तस्करांना जोरदार दणका दिला. उत्राण आणि करदन शिवारात २५ व २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारी चार वाहने, त्यातील १६ ब्रास वाळू आणि नदीपात्रात साठवून ठेवलेली ६० ब्रास वाळू असा एकूण ३१ लाख ५८ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, कारवाईमुळे कासोदा-एरंडोल परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली.
उत्राण गावाच्या वेशीजवळ मारुती मंदिर परिसरात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास टाटा मॉडेल १५१२ सहाचाकी आयशर वाहन (एमएच १८ बीजी ७२८) संशयास्पद स्थितीत आढळले. या वाहनात पाच ब्रास वाळू भरलेली होती. कारवाईसाठी पथक पुढे येताच चालक वाहन जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या कारवाईत सहा लाख २३ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
करदन शिवारातील गिरणा नदीपात्रात २६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आठ ब्रास वाळूने भरलेला निळ्या रंगाचा टाटा डंपर (एमएच १८ सीबी १९२०) ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी वाहनमालक निलेश राजेंद्र भदाणे आणि चालक रामू महादेव शिवाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत आठ लाख ३७ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास दोन ब्रास वाळूची वाहतूक करणारे चॉकलेटी रंगाचे आयशर वाहन (एमएच २० जीसी ९१४७) पकडण्यात आले. याप्रकरणी चालक शाहरुख शब्बीर पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहा लाख नऊ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मध्यरात्री दोनच्या सुमारास एक ब्रास वाळू वाहून नेणारा टाटा डंपर (एमएच ४८ एजी १५९३) पथकाने पकडला. याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील विचूर येथील भूषण शिवाजी सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आठ लाख चार हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चारही वाहनांमधील १६ ब्रास वाळू जप्त करण्याबरोबरच गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा साठाही पथकाने ताब्यात घेतला. हा साठा एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार नितीन सूर्यवंशी, धर्मेंद्र ठाकूर, श्रीकांत ब्राम्हणे, निलेश गायकवाड आणि योगेश पाटील यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. महसूल विभागाकडून एरंडोलचे तहसीलदार गोपाळ पाटील, मंडळ अधिकारी नदीम शेख, ग्राम महसूल अधिकारी रवीराज साहेबराव पाटील, वैभव पाटे, संदीप पाटील आणि नरेंद्र पाटील यांनी कारवाईत सहभाग नोंदविला. संयुक्त पथकाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले.