Ganeshotsav Dispute Jalgaon | गणेश मंडळावर दोन अध्यक्षांचा दावा; विसर्जनापूर्वी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच महापालिकेत वादाची ठिणगी

पुण्याहून आलेले सचिन नारळे आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक; पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मध्यस्थीने वाद निवळला
  Jalgaon Ganesh Mandal Dispute
Jalgaon Ganesh Mandal DisputePudhari
Published on
Updated on

Jalgaon Ganesh Mandal Dispute

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असताना जळगावातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे. एकाच मंडळावर दोन गटांनी दावा केल्याने दोन अध्यक्ष आमनेसामने आले असून, सोमवारी महानगरपालिका सभागृहात वरिष्ठ प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या विसर्जनपूर्व बैठकीतच वादाची ठिणगी पडली. बैठकीनंतर सभागृहाबाहेर सचिन नारळे आणि ढोल-ताशा पथकातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शहर पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, २५ सप्टेंबरच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या बैठकीतच वादाची ठिणगी

येत्या २५ सप्टेंबर रोजी जळगाव शहरात गणेश विसर्जन सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीच्या नियोजनासाठी सोमवारी महानगरपालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपायुक्त निर्मला गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, डीवायएसपी गणपुरे, पोलिस निरीक्षक जयस्वाल, पोलिस निरीक्षक शेवाळे, शहर पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

  Jalgaon Ganesh Mandal Dispute
Jalgaon News: गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांनी दिला नकार; रागाच्या भरात 12 वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल

बैठकीदरम्यान सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणून सांगितले जाणारे सचिन नारळे मार्गदर्शन करीत होते. त्या वेळी त्यांच्या वक्तव्यावरून काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. विशेषतः ढोल-ताशा पथकातील कार्यकर्त्यांनी नारळे यांनी केलेल्या ‘ढोल-ताशावाल्यांनो’ या संबोधनाबाबत जाब विचारला. त्यातून शाब्दिक वादाला सुरुवात झाली. सभागृहाबाहेर हा वाद वाढत असताना पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी हस्तक्षेप केला. कार्यकर्ते आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर परिस्थिती शांत झाली.

एकाच मंडळाचे दोन अध्यक्ष; शहरात संभ्रम

सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून जळगावात हालचाली सुरू आहेत. प्रशासनाच्या पहिल्या बैठकीत ‘अविनाश आचार्य प्रणित सार्वजनिक गणेश मंडळा’चे अध्यक्ष म्हणून मुकुंद मेटकर यांनी उपस्थित राहून मंडळाची भूमिका मांडली होती. त्यानंतर पुण्याहून आलेल्या सचिन नारळे यांनी आपणच सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष असल्याचे जाहीर केल्याने अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला.

मुकुंद मेटकर की सचिन नारळे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने मंडळातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. दोन्ही गटांकडून मंडळावर दावा केला जात असल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.

  Jalgaon Ganesh Mandal Dispute
Jalgaon Rain | जळगाव जिल्ह्यात पावसाची ओढ; सरासरीच्या केवळ ४२.२ टक्के पाऊस

विसर्जनाच्या तोंडावर पोलिसांची चिंता वाढली

२५ सप्टेंबरच्या विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्ताचे नियोजन सुरू असतानाच सार्वजनिक गणेश मंडळातील अंतर्गत वादामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. मनपा प्रवेशद्वाराजवळील वाद अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने थांबवण्यात आला असला, तरी मिरवणुकीतील मानाच्या जागा, नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील मतभेदांवरून संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीपूर्वी मंडळातील वाद मिटविण्यासाठी प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news