

जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत टप्पा दोनमध्ये बुधवार (दि.27) रोजी जिल्हाभरात 34,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत 2024-25 या वर्षात जळगाव जिल्ह्यासाठी एकूण 86,689 घरकुले मंजूर करण्यात आली होती. यापैकी पहिल्या हप्त्यात 71,645 लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले. जिल्ह्यात मंगळवार, 4 मार्च रोजी एकाच वेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये घरकुल सुरू करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत 35,264 घरकुलांचे काम सुरू करण्यात आले.
बुधवार (दि.27) रोजी आणखी 35,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले असून, एकूण 70,687 घरकुलांचे काम सुरू झाले आहे. या उपक्रमात सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. लाभार्थ्यांना घरे सुरू करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. याशिवाय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी तालुकास्तरीय भेटी घेऊन जास्तीत जास्त घरकुले सुरू करण्यावर भर दिला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सातत्याने पाठपुरावा करून घरकुल पूर्ण करण्याचे मार्गदर्शन केले.