

जळगाव: शहरातील कालिका माता परिसरात शुक्रवार (दि.19) रोजी आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ, स्टेट बँकेसमोरील पत्र्याच्या शेडखालील काही दुकानांना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. काही मिनिटांतच आगीचे लोळ वेगाने पसरल्याने अनेक दुकाने जळून खाक झाली असून परिसरात मोठी खळबळ उडाली.
या आगीत व्हीनस ऑप्टिकलचे गणेश राणे, भगवती ऑटोमोबाईलचे पुष्पक खडके, श्री विघ्नहर्ता स्पेअर पार्ट अँड सर्व्हिसेसचे भूषण वाघुळदे तसेच सखी मॅचिंग सेंटरचे प्रदीप खडके यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पुष्पक खडके यांनी अवघ्या तीन दिवसांपूर्वीच स्पेअर पार्ट विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला होता. मात्र पहिल्याच आठवड्यात आगीने त्यांच्या स्वप्नांना मोठा धक्का दिला.
दुकानांमधील अंतर अत्यंत कमी असून केवळ दोन ते तीन इंचाचा गॅप आणि वर पूर्ण पत्र्याचे शेड असल्यामुळे आग एका दुकानातून दुसऱ्या दुकानात झपाट्याने पसरली. आगीत दुकानांतील साहित्य, यंत्रसामग्री, पंखे आणि इतर सामान पूर्णतः जळून खाक झाले किंवा वाकले गेले. संबंधित दुकानदारांनी प्रत्येकी सुमारे १५ ते ३० लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत चार ते पाच दुकाने मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली होती. आगीच्या तीव्र उष्णतेमुळे दुकानांच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या कारच्या काचा फुटल्याचेही निदर्शनास आले.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेजारील खाद्यपदार्थाच्या दुकानात गॅस सिलेंडर असतानाही ते दुकान आगीपासून वाचले. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. वेळेवर आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजू मामा भोळे आणि माजी नगरसेवक वीरण खडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त दुकानदारांशी संवाद साधून प्रशासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, घटनेची माहिती पसरताच परिसरात नागरिक आणि दुकानदारांनी मोठी गर्दी केली होती.