जळगाव : केळीपीकासाठी प्लास्टिक, थर्मोकॉलच्या अतीवापरामुळे होतेय जमिनीची धूप
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी ही जगप्रसिद्ध आहे. जळगावातून केळीला मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या बाहेर इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी केळीला डाग किंवा नुकसान होऊ नये म्हणून केळी वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये थर्माकोल व पॅकिंग प्लास्टिकचा वापर करण्यात येतो. परंतु प्लास्टिक, थर्मोकॉलच्या मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने रस्त्याच्या कडेला थर्मोकॉल विखुरलेले असतात. परिणामी जमिनीची धूप होत आहे.
रावेर परिसर पूर्वीच डार्क झोन म्हणून ओळखला जात असून येथील पाण्याची पातळी खालावलेली आहे. त्यात केळी घड काढण्यापासून तर विक्रीपर्यंत नेण्यासाठी प्लास्टिक व थर्मोकॉलचा भडीमार होत आहे. अशारीतीने प्लास्टिक व थर्मोकॉलचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने जमिनीत पाणी मुरण्याचा प्रश्न उद्भवत असल्याने प्लास्टिक, थर्मोकॉलच्या अतीवापरामुळे परिणामी जमिनीची धूप होत आहे.
केळीच्या घडाला प्लॅस्टिकचे आवरण
जळगावमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेण्यात येते. केळीमध्ये नवनवीन तंत्र विकसित झालेले असून त्याचा वापरही शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहे. केळीच्या घडाला कोणतीही वस्तू लागू नये म्हणून केळीच्या घडाला प्लॅस्टिकचे आवरण घालण्यात येत आहे.
तसेच केळीचे घड कापून आणल्यानंतर त्यांना स्वच्छ केल्यानंतर वाहतूक वाहनामध्ये लोड करताना केळीच्या आजूबाजूला धक्के लागून किंवा प्रवासामध्ये केळीचे नुकसान होऊ नये म्हणून संपूर्ण वाहन आधीच थर्माेकॉलच्या बारीक आवरणाने आच्छादण्यात येते. त्यामुळे केळीच्या फळाचे नुकसान होत नाही.
प्लास्टिक व थर्माेकॉलमुळे जमिनीची धूप
प्लास्टिक व थर्माेकॉलच्या अतीवापरामुळे जागोजागी सावदापासून तर थेट रावेर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही कडेला मुख्यत: विवरे-वाघोदा, विवरे-खुर्द या गावाजवळ मोठ्या प्रमाणात उकिरड्यांवर रस्त्यांवर प्लास्टिक व थर्माेकॉलचे थरच्या थर किंवा तुकडे विखुरलेले असतात. हवेमुळे ते आणखी पसरतात.
वारंवार एकाच ठिकाणी प्लास्टिक व थर्माेकॉल पडून राहिल्याने जमिनीमध्ये पाणी कसे जिरणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण प्लास्टिक नष्ट होत नाही किंवा त्याला रिसायकलला पाठवण्यात येत नाही हे कचऱ्यात टाकण्यात येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
परिणामी जमिनीची धूप होत आहे. रावेर विभाग हा भाग डार्क झोन म्हणून जिल्ह्यात व राज्यात मोडतो. रावेर व यावल भागात पाण्याचे अत्यल्प प्रमाण असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या भागातील पाणी पातळी खूप खोलवर गेलेली असल्याने या परिसराला डार्क झोनमध्ये टाकण्यात आलेले आहे. त्यातच प्लास्टिक व थर्माेकॉल उकिरड्यांवर पडलेले किंवा रस्त्याच्या कडेला पडलेले राहिल्याने जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 मध्ये ग्रामपंचायत व नगरपालिकेने कचऱ्याची (थर्माकोल व प्लास्टिकची) योग्य ती विल्हेवाट लावावी. जर त्यांनी कारवाई केली नाही तर जिल्हा परिषदेला, जिल्हा प्रदूषण महामंडळ व जिल्हाधिकारी यांना अर्ज द्यावा, त्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई केली जाईल.
करणसिंग राजपूत, प्रदूषण महामंडळ, जळगाव.

