

जळगाव: यावल तालुक्यातील साकळी येथील प्रकाश गणेशमल जैन (वय ६५) केरळ राज्यात कुटुंबासह फिरायला जात असताना रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.23) रोजी मध्यरात्री घडली.
जैन व त्यांचे मित्रपरिवार शुक्रवार (दि.21) रोजी भुसावळ येथून मंगला एक्स्प्रेसने केरळसाठी रवाना झाले होते. या प्रवासादरम्यान रविवार (दि.23) रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास प्रकाश जैन यांनी नातू पार्श याच्याशी संवाद साधून आपला मोबाईल त्याच्या जवळ दिला. त्यानंतर लघुशंकेसाठी शौचालयाकडे गेले. पुढील स्टेशन किती दूर आहे, हे पाहण्यासाठी दरवाजाजवळ गेले असता अचानक तोल जाऊन ते रेल्वेतून थेट खालीच पडले.
गाडीतील इतर प्रवाशांनी ही घटना पाहून आरडाओरड केली. त्यांच्या मुलगा स्वप्निल जैन याने त्वरित चेन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यानंतर तो जवळपास दोन किलोमीटर मागे धावत जाऊन घटनास्थळी पोहोचला. तिथे प्रकाश जैन बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या पोटाला लोखंडी पाईप लागल्याने खोलवर जखम झाली होती व मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन नाकातूनही रक्तस्राव झाला होता.
बैकुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत कासरगोड-निलेश्वरी रेल्वे स्टेशनदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेतील जैन यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने कासरगोड येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
प्रकाश जैन यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव येथील लाईफ केअर फार्मास्युटिकल तसेच पार्श फार्मास्युटिकलचे संचालक स्वप्निल जैन यांचे वडील होते. तसेच, फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रा. स्वीटी रितेश जैन यांचे वडील आणि साकळी येथील डॉ. पी. सी. जैन यांचे जावई होते.