

जळगाव : मीरा-भाईंदर पोलिसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईनंतर जागे झालेल्या जळगाव जिल्हा पोलिसांनी आता अंमली पदार्थ तस्करांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. शहर आणि एमआयडीसी परिसर अंमली पदार्थांचे मुख्य केंद्र बनत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि एमआयडीसी पोलिसांनी ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री संयुक्त सापळा रचून तब्बल ११ लाख १७ हजार २०० रुपयांचे ‘इफेड्रिन’ हे घातक रसायन व गांजा जप्त केला. या कारवाईत एका कुख्यात तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
एमआयडीसी परिसरातील नारियलवाला बाबा दर्गा समोरील रस्त्यावरून काळ्या रंगाच्या बर्गमॅन मोपेडवरून इफेड्रिनची तस्करी होणार असल्याची पक्की गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या परवानगीने राजपत्रित अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री ११:४० वाजता दर्ग्यासमोर सापळा लावण्यात आला. संशयित आरोपी नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल (वय ५५, रा. रामनगर, मेहरुण, जळगाव) मोपेडवरून येताना दिसताच पोलिसांनी त्याला घेरले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दबा धरून बसलेल्या पथकाने फिल्मी स्टाईल पाठलाग करत त्याला जागीच पकडले.
डिक्की उघडताच पोलिसांना धक्का; जिमच्या नावाखाली नशा?
मोपेडच्या डिक्कीची झडती घेतली असता, त्यात एमडी (MD) ड्रग्स तयार करण्यासाठी, तसेच बॉडी बिल्डिंगमध्ये वजन/फॅट कमी करण्यासाठी वापरले जाणारे पांढऱ्या रंगाचे स्फटिकयुक्त 'इफेड्रिन' रसायन आणि गांजाचा मोठा साठा आढळून आला.
इफेड्रिन (पांढरी स्फटिक पावडर): १ किलो ९६३ ग्रॅम (किंमत रु. ९,८१,५००/-)
गांजा (काड्या, पाने, फुले, बिया): २ किलो ११४ ग्रॅम (किंमत रु. १,०५,७००/-)
बर्गमन मोपेड (MH-19-EK-4305): अंदाजे किंमत रु. ३०,०००/-
एकूण मुद्देमाल: ४ किलो ०७७ ग्रॅम (एकूण किंमत रु. ११,१७,२००/-)
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी केलेल्या प्राथमिक तपासणीत हे पदार्थ 'इफेड्रिन' व 'गांजा' असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नूर मोहम्मद पटेल याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा (गु.र.नं. ०७०४/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राहुल गायकवाड, पोनि. बबन आव्हाड, सपोनि अशोक काळे, दीपक जगदाळे, संतोष पवार, अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरली धनगर, महेश सोमवंशी, गोपाल पाटील, रवींद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे व जयंत चौधरी यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोउनि संतोष पवार करत आहेत.